रविवार, ४ मार्च, २०१२

saundarya tips

उन्हाळा सुरु झाला आहे त्यामुळे त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे
खास करून pigmentated  skin साठी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
१) उन्हात जाताना सनस्क्रीन चा वापर करावा आणि छत्री बाळगावी .
२) उन्हातून आल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा, तोंडात पाणी भरून डोळ्यांवर थंड पाण्याचे २-३ सपके मारा म्हणजे डोळ्यांतील उष्णता निघून जाईल. काळी वर्तुळे व सुरकुत्या कमी होतील.
३) उन्हातून आल्यावर कच्चे दुध चेहऱ्यावर लावावे आणि नंतर चेहरा धुवावा .
४)आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर मध, हळद, दुधावरची साय यांचा लेप करून लावावा याने काळे डाग कमी होतात आणि त्वचेच रंग उजळण्यास मदत होते. चेहरा ब्लीच केल्यासारखा वाटतो
५) रात्री झोपताना बदामाचे  तेल  डोळ्यांच्या आजूबाजूस चोळावे. याने डोळ्यांखालील काळेपणा कमी होतो




 

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

Pushpa kaku

 पहाटेची वेळ, सांर पुण गुलाबी थंडीत  साखरझोपेत हेलाकावाने घेत होत. रामाच्या देवळात काकड आरतीचे सूर घुमत होते, दारातला पारिजातक आपल्या शुभ्र कोमल फुलांची बरसात करून चांदण्याचा आभास करत होता. फुलांच्या सुगंधाने वातावरण प्रफ्फुलीत होत होत. दारात रांगोळीचे रंग उमटत होते. अधून मधून एखादे वाहन रस्त्यावरून झर्रकन जाताना दिसत होते. आकाशात चंद्र आपल्या सौंदर्याची उधळण करत होता. इतक्यात आलार्म झाला , सुंदर स्वप्नाची रजई  बाजूला सारून पुष्पा काकू जाग्या झाल्या. अंघोळ उरकून कामाला लागल्या , पुष्पा काकू म्हणजे एक अनोख व्यक्तिमत्व. उंची किमान पाच फूट , गोरी कांती , लांबसडक काळेभोर केस आणि रोज न चुकता त्यात माळलेल एखादे फुल, कपाळावर कुंकू आणि ओठांवर हसू. बहुदा त्यामुळेच त्याचं नाव पुष्पा असावे. घरात गडगंज संपत्ती पण त्यांनी कधीही त्याबद्दल गर्व बाळगला नाही. रोज स्वतःच्या हातांनी विणलेला फुलाचा हार घेऊन नागेश्वरला जायच्या. आतापर्यंत तर त्या नागेश्वरालाही पुष्पा काकूंच्या हराशिवाय पूजा झाल्यासारखे वाटत नसेल. घरातील सगळी कामे त्या स्वतः करायच्या आणि रोज दुपारी न चुकता आमच्या घरी गप्पा मारायला यायच्या.. आता पुष्पा काकू पुण्यात नाहीत परंतु  त्यांच्या आठवणी आजून त्या वाड्यात दरवळत आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो. २ वर्षे झाली त्या अमेरिकेला गेल्या आहेत. पहाटेचा चंद्र आणि देवळातला नागेश्वर आजूनही त्याची वात पाहत आहे.

मंगळवार, २२ मार्च, २०११

Minu aatya

कालचीच गोष्ट, दुपारचे बारा वाजले होते. सुर्यनारायण आग ओकत होते. उन्हाच्या प्रचंड झळा अंगाची काहिली करत  होत्या. रोज रोज राशन ऑफिसच्या खेट्या घालून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.  "आज रेशन कार्डवरचा पत्ता बदली करून घ्यायचाच", " नाहीतर ते रेशन कार्ड त्या ऑफिसर च्या थोबाडावर मारायचे",  या आवेगाने मी झपझप चालत होते. इतक्यात कोणीतरी डोक्यात टप्पू मारला. मी जरा रागातच मागे वळून पहिले.    निळ्या रंगाचा गाऊन. डोळ्यावर  काळ्या कड्याचा चष्मा.  मेहंदीने लाल केले केस. रंग जरा सावळाच.  तिने मला पहिले आणि तिच्या ओठांवर इंद्रधनू चमकले. किती दिवसांनी बघत होती मी तिला. मिनू  आत्या म्हणजे आमची जुन्या घराची घरमालकीण.  कोणाचीही हिम्मत नाही तिच्याशी वर आवाजात बोलण्याची. तशी ती प्रेमळ. पण जर तिचा पारा चढला तर मग मे महिन्यातील नागपूरही थंड वाटेल तिच्या रागापुढे!  सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारी आणि आपण कधीही कोणाच्या तालावर न नाचणारी म्हणजे मिनू   आत्याच!. म्हणूनच बहुदा तिने लग्न केले नसावे. आणि जरी केले असते तरी त्या नवरदेवाचे बाराच वाजले असते. पण हि कधीही शक्य नसणारी गोष्ट. त्या बद्दल विचार करणे म्हणजे "आत्याबाईला मिशा असत्या तर काका झाला असता" असे आहे. असे असूनही  मिनू  अत्त्या सगळे घर एकटी सांभाळायची.  तिचा जन्मच मुळात श्रीमंत घरात झालेला. आलिशान ५ खोल्यांचे घर , घरासमोर गार्डन,  आणि घरामागे आंब्याचे झाड. शिवाय आम्ही जेथे राहत होते तेथले घरभाडे.  एवढे असूनही तिला मात्र पैशांचा मुळीच गर्व नव्हता. सतत काहीतरी करत राहायची. वेळ जात नाही म्हणून मण्यांच्या माळा विणणे, बांगड्या बनवणे असे उद्योग तिचे चालूच असायचे. तिच्याबरोबर तिच्या दोन बहिणीही होत्या. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी अश्या विचारांची ती होती. प्रेमळ असली तरीही थोडी तापटच होती.  समोरच्याचे  म्हणणे पटले नाही तर मनात न ठेवता सरळ बोलून दाखवायची. अहो बोलून कसले दाखवायची सरळ भांडायलाच लागायची.  आणि भांडून भांडून त्या माणसाचे मुस्काट पडले नाहीतर तिला चुकल्या चुकल्यासारखे  वाटायचे..त्यामुळे लोक जरा तिला दचकूनच राहायचे .  "उगाचच चढत गाढव अंगावर कशाला ओढून घ्या".  एकदा मिनू  अत्त्या ब्युटी पार्लर मध्ये गेली होती. तिचे आयब्रो   जरा जास्तच बारीक केल्यामुळे तिने त्या पार्लरवालीचे आयब्रोच  भादरून टाकले होते. आणि त्या नंतर उभ्या आयुष्यात  ती  काय पार्लर ची पायरी चढली नाही.  असे असले तरी आमच्या बरोबर ती जरा प्रेमानेच वागायची. "सोडवल तर सुत नाहीतर भूत" अशी होती मिनू  आत्या. आता वयामानाने थोडी थकलेली पण तरीही  चेहऱ्यावर तीच चमक होती.  आणि शब्दांमध्येहि  भांडण्याची तीच धमक होती. आज किती दिवसांनी भेटली असे म्हणून तिने माझी आणि आईची विचारपूस केली. ती तिच्या भाषणाची तालीम सुरु  होणार,  इतक्यात मी खूपच घाईत  आहे असा बहाणा करून काढता पाय घेतला. आणि राशन ऑफिस गाठले.

शुक्रवार, १८ मार्च, २०११

31 december

३१ डिसेंबरची सकाळ उगवली, खिडकीतून सूर्यदेव डोकाऊ लागले आणि मला झटकन जाग आली. आज काहीतरी स्पेशल होते आणि ते म्हणजे माझ्या काकाचा वाढदिवस.  दरवर्षीप्रमाणे पुण्याहून  काका, काकू आणि आमचे  चार  बंधुराजे येणार होते. त्यामुळे घरातील सगळेच आनंदात होते. आईचा हात घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत होता.सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. घरातील आवरेपर्यंत दुपार लोटली आणि दारावरची बेल वाजली. दार उघडताच .मावळे देखील शत्रूवर जेवढ्या वेगाने  आक्रमण करत नसतील  तेवढ्या वेगाने पुण्याचे सैन्य  घरात गुसले आणि थेट हॉलमधील टेबल fan वर धडकले . त्या प्रसंगानंतर त्या  fan ला जी मानमोडी झाली ती कायमची.  या वरून तुम्ही अंदाज घेतलाच  असेलच कि घरात पुढे काय काय झाले असेल. तसे तर लहानपणापासून आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो  असल्यामुळे आम्हाला या सगळ्याची सवय झालेली. दुपारची जेवणे आटोपली काकू आणि आई गप्पा गोष्टी करण्यात गुंतून गेल्या. बायका एकदा गप्पा मारायला लागल्या कि त्यांना वेळ पुरत नाही हे काय वेगळे सांगायलाच नको आणि त्यातल्या त्यात आमची काकू म्हणजे गप्प राहिली ती काकू कसली. बर्थडे बॉय शांत झोपी गेला होता.आणि आमचे मावळे पुन्हा युद्धाचे रणशिंग फुंकून युद्ध  करण्यात गुंतून गेले होते.तेवढ्यात फोनेची रिंग खनानु लागली. तासाभरातच पप्पा ऑफिसातून  घरी येणार होते.संध्याकाळ  झाली केक कापून बर्थडे साजरा झाला. आई आणि काकूने चिकन बिर्याणीचा बेत केला होता. जेवंन झाली आणि नवीन वर्षाच्या सहलीबद्दल प्रत्येकजण आप आपले ठराव मांडू लागले.आलिबाग, गणपती पुळे,माथेरान अशा वेगवेगळ्या ठिकाणाची यादीच तयार झाली आणि सर्वमताने माथेरान या ठिकानाचा ठराव पास झाला. सकाळच्या प्रवासाने थकलेले आमचे हिरे लवकरच झोपी गेले आणि स्वप्नांच्या दुनियेत फिरता फिरता सकाळी लवकरच उठले.माथेरान ला जाण्याची तयारी झाली. २ दिवस राहण्याचा बेत होता. सकाळी ८ वाजता आम्ही घर सोडले. लोकल ट्रेन ने नेरळ स्टेशन पर्यंत गेलो तिथून माथेरान ला जाण्यास जवळ जवळ एक ते दीड तास लागला.माथेरान ला पोहचल्यावर आम्ही पहिल्यांदा हॉटेल बुक केल थोडा वेळ आराम केला आणि माथेरान चे सोंदर्य पाहण्यासाठी बाहेर पडलो. गार वारा सुटला होता.घोड्यांच्या टापा वाजत होत्या आम्ही बाजारपेठेच्या दिशेने चालत होतो. तेवढ्यात फुलरानीने होर्न दिला. आम्ही बाजारपेठेत गेलो थोडी फार खरेदी केली. आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सनसेट point  च्या दिशेने चालू लागलो. माकडांना शेंगदाणे चारत आम्ही sunsetpoint पर्यंत पोहोचलो येत जाता नवीन जोडपी दिसतच होती. थंड वातावरणाचा पुरेपूर उपयोग करत होती. आम्ही सूर्यास्त बघितला फोटो काढले. आणि परत निघालो बाजारपेठेत आल्यावर तेथील बागेत बसलो. ती बाग खरच खूप सुंदर होती. लहान मुले खेळत होती. आमचे बंधुराज हि इकडे तिकडे बागडत होते अधून मधून काहीतरी खोड्या करून काकूचा मार मात्र न चुकता खात होते..दुसऱ्या दिवशी इक्को point , लॉर्ड point  बघितला आणि आजून काही point पाहून आम्ही परतीच्या वाटेवर चालू लागलो. येताने मात्र आम्हाला अथक परिश्रमानंतर  फुलराणीचे तीकित मिळाले. गाडीत बसल्या बसल्या काकूचा हात अभी (लहान भाऊ)च्या  पाठीवर पडला आणि अभिच्या सनयीने आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.दोन्ही बाजूने गर्द झाडी आणि त्यातून चालणारी फुलराणी,. येता येता  कड्यावरच्या गणपतीचे दर्शन झाले. नेरळ स्टेशन आले आणि आमच्या  सहलीची सांगता झाली..........