कालचीच गोष्ट, दुपारचे बारा वाजले होते. सुर्यनारायण आग ओकत होते. उन्हाच्या प्रचंड झळा अंगाची काहिली करत होत्या. रोज रोज राशन ऑफिसच्या खेट्या घालून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. "आज रेशन कार्डवरचा पत्ता बदली करून घ्यायचाच", " नाहीतर ते रेशन कार्ड त्या ऑफिसर च्या थोबाडावर मारायचे", या आवेगाने मी झपझप चालत होते. इतक्यात कोणीतरी डोक्यात टप्पू मारला. मी जरा रागातच मागे वळून पहिले. निळ्या रंगाचा गाऊन. डोळ्यावर काळ्या कड्याचा चष्मा. मेहंदीने लाल केले केस. रंग जरा सावळाच. तिने मला पहिले आणि तिच्या ओठांवर इंद्रधनू चमकले. किती दिवसांनी बघत होती मी तिला. मिनू आत्या म्हणजे आमची जुन्या घराची घरमालकीण. कोणाचीही हिम्मत नाही तिच्याशी वर आवाजात बोलण्याची. तशी ती प्रेमळ. पण जर तिचा पारा चढला तर मग मे महिन्यातील नागपूरही थंड वाटेल तिच्या रागापुढे! सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारी आणि आपण कधीही कोणाच्या तालावर न नाचणारी म्हणजे मिनू आत्याच!. म्हणूनच बहुदा तिने लग्न केले नसावे. आणि जरी केले असते तरी त्या नवरदेवाचे बाराच वाजले असते. पण हि कधीही शक्य नसणारी गोष्ट. त्या बद्दल विचार करणे म्हणजे "आत्याबाईला मिशा असत्या तर काका झाला असता" असे आहे. असे असूनही मिनू अत्त्या सगळे घर एकटी सांभाळायची. तिचा जन्मच मुळात श्रीमंत घरात झालेला. आलिशान ५ खोल्यांचे घर , घरासमोर गार्डन, आणि घरामागे आंब्याचे झाड. शिवाय आम्ही जेथे राहत होते तेथले घरभाडे. एवढे असूनही तिला मात्र पैशांचा मुळीच गर्व नव्हता. सतत काहीतरी करत राहायची. वेळ जात नाही म्हणून मण्यांच्या माळा विणणे, बांगड्या बनवणे असे उद्योग तिचे चालूच असायचे. तिच्याबरोबर तिच्या दोन बहिणीही होत्या. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी अश्या विचारांची ती होती. प्रेमळ असली तरीही थोडी तापटच होती. समोरच्याचे म्हणणे पटले नाही तर मनात न ठेवता सरळ बोलून दाखवायची. अहो बोलून कसले दाखवायची सरळ भांडायलाच लागायची. आणि भांडून भांडून त्या माणसाचे मुस्काट पडले नाहीतर तिला चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे..त्यामुळे लोक जरा तिला दचकूनच राहायचे . "उगाचच चढत गाढव अंगावर कशाला ओढून घ्या". एकदा मिनू अत्त्या ब्युटी पार्लर मध्ये गेली होती. तिचे आयब्रो जरा जास्तच बारीक केल्यामुळे तिने त्या पार्लरवालीचे आयब्रोच भादरून टाकले होते. आणि त्या नंतर उभ्या आयुष्यात ती काय पार्लर ची पायरी चढली नाही. असे असले तरी आमच्या बरोबर ती जरा प्रेमानेच वागायची. "सोडवल तर सुत नाहीतर भूत" अशी होती मिनू आत्या. आता वयामानाने थोडी थकलेली पण तरीही चेहऱ्यावर तीच चमक होती. आणि शब्दांमध्येहि भांडण्याची तीच धमक होती. आज किती दिवसांनी भेटली असे म्हणून तिने माझी आणि आईची विचारपूस केली. ती तिच्या भाषणाची तालीम सुरु होणार, इतक्यात मी खूपच घाईत आहे असा बहाणा करून काढता पाय घेतला. आणि राशन ऑफिस गाठले.